सगळ्यांना पॅक करू! - मराठीसृष्टी (Marathisrushti) : साहित्य/ललित लेखन:साहित्य/ललित लेखन


Members Login :
Login ID :
Password :
   

Mayboli (Marathi Typing Software)

सगळ्यांना पॅक करू!
........किशोर कुलकर्णी   



हॉल म्हणविल्या जाणाऱया दहा बाय बाराच्या खोलीमध्ये मी संकोचून बसलो होतो. हो, घर माझेच होते; पण आलेले पाहुणे मला घरच्यासारखे वाटत नव्हते अन् ते मात्र स्वतचे घर असल्यासारखे विसावले होते. ही चहापाण्याच्या तयारीत गर्क होती. सोप्याच्या सिंगल सीटवर तो बसला होता. सावळा पण धडधाकट, आवाजात सौम्यपणा आणण्याचा प्रयत्न तो करीत असला तरी त्यातली जरब जाणवण्यासारखी होती. एरवीही त्याला मी पाहिले होते; कधी चौकात.. तर कधी त्याच्या मोटरीत... त्याच्या गाडीतला स्पीकर इतका मोठा असे की सगळ्या चौकात आवाज जावा. हाताच्या चारही... म्हणजे आठही बोटांत अंगठ्या आणि गळ्यात मोठा गोफ. शर्टाचे एक बटन उघडे. अधूनमधून तो हातातल्या ब्रेसलेटशी चाळा करीत होता. माझा तो अंदाज घेत असावा, असे मला उगाचच वाटून जात होते. त्याच्याबरोबर दहा-बारा जणांचा ताफा होता. त्यांचेही सर्वसाधारण स्वरूप हे असेच... पण, अंगठ्यांची संख्या किंवा गोफाचा आकार लहान. बराच वेळ बहुधा शांततेत गेला असावा किंवा मला तसे वाटत असावे. अशा या प्रदीर्घ शांततेचा भंग करून तो म्हणाला, ``भाऊ तुम्ही नाही म्हणू नका, वैनीला परवानगी द्या फक्त. बाकी सारं आपल्याकडं लागलं. वैनीला कायबी करायची गरज नाही. त्यांनी फक्त आम्ही म्हणू त्याला होय म्हणायचं बस्स.''

मी बसल्या जागेवरच्या कोपऱयातून ओरडल्यासारखा आवाज दिला... ``अग ये.'' बहुधा माझा आवाज नीटसा फुटला नसावा किंवा तो काहीतरी विचित्र झाला असावा. ती बाहेर आली, पण प्रश्नार्थक चेहरा घेऊन - `काय झालं?' असे तिला विचारायचे होते. तेवढ्यात प्रयत्नपूर्वक विनम्र झालेल्या त्याने विचारले, ``त्यात वैनीला काय विचारायचं. त्यांनी फक्त सही करायची.'' आपण काही तरी मोठी चूक करतोय हे त्याच्याही लक्षात आले असावे.
तसा तो म्हणाला, ``तसं नाही. लोकशाही आहे अन् महिलांनाबी विचार असतोच की. बोला वैनी, या वेळी आपल्या वॉर्डातून तुम्ही उमेदवारी द्यायची.''

हिची प्रतिक्रिया मला नीट कळाली नाही. ती माझ्याकडे पाहात होती अन् आपल्याला कोणीतरी बहुमान देतोय, या भावनेने तिचा चेहरा फुलून गेला होता. मी काही बोलणार तेवढ्यात तो म्हणाला, ``वैनी, आपला वॉर्ड राखीव झालाय. सुशिक्षितांचा वॉर्डय. म्हणलं तिथं तुमच्यासारख्या संभावित महिलेचीच निवड व्हायला हवी.'' संभावित या शब्दाने मी हादरलोच होतो, पण त्याच्या एका त्यातल्या त्यात कमी उग्र किंवा अधिक सज्जन दिसणाऱया तरुणाने दुरुस्ती केली. तो म्हणाला, ``सोज्वळ म्हणायचंय त्यांना.'' हे होईतो त्याने फॉर्म कसा भरायचा, किती प्रती भरायच्या या तपशिलाची चर्चा सुरू केली. आपण अधिक कोपऱयात गेलो आहोत, असे मला वाटायला लागले. मी उठलो तसा तो म्हणाला, ``वैनी, तुम्ही बसा. आता तुम्ही आमच्या लिडर. तुम्हाला तर भाषणंही देता येतात.'' ही ज्युनियर कॉलेजमध्ये लेक्चरर आहे याची त्यांना माहिती असावी. एकूण काय सगळे ठरले असल्यासारखे वातावरण होते. मला आता बोलणे भाग होते. मी काहीतरी बोललेही; पण ते कोणाच्याच लक्षात नाही आले. मी उभा होतोच. घसा खाकरला.. छातीत श्वास भरून घेतला. अवसान आणले आणि म्हणालो, ``हे बघा, तिची तयारी असेल तर माझी हरकत नाही.'' लोकशाहीवर केवळ विश्वासच नव्हे, तर श्रद्धा आहे हे सिद्ध करण्यासाठी असे बोलण्याशिवाय गत्यंतर नव्हते.

``पण निवडणुका म्हटल्या की त्यात आरोप-प्रत्यारोप, शिवीगाळ, भ्रष्टाचार, जातीयता, फोडाफोडी, पैशाचं वाटप किंवा केवळ आश्वासनांची खैरात असं काही होणार असेल तर आम्ही बाजूलाच थांबू. लोकशाहीतलं कर्तव्य म्हणून मतदान मात्र करू. तेही आमच्या स्कूटरनं जाऊन..''

माझे हे निवेदन होईतो बहुधा मला धाप लागली. मी थांबलो, तेव्हा हिने हातात पाण्याचा ग्लास दिला. त्याची मला खरेच गरज होती. मी पाणी पित असतानाही त्या खोलीत दाटीवाटीने बसलेल्यांच्या नजरा माझ्यावर स्थिरावल्याचे मला जाणवत होते. काहींच्या चेहऱयावर माझ्याबद्दल कमालीची कणव तर काहींच्या चेहऱयावर `तरी आम्ही सांगतच होतो' असा भाव मला वाचता येत होता. त्यालाही आता काय बोलावे हे कळत नव्हते. एवढ्यात संभावित आणि सोज्वळ या शब्दातला फरक जाणणारा तरुण पुढे आला. आता तो मला अधिक जवळचा वाटू लागला होता. तो म्हणाला, ``लोकशाहीत निवडणुका हे लोकशिक्षणाचे प्रभावी माध्यम आहे, असं बड्या नेत्यांना म्हटलेलं आहे.''

``कोणी?'' एक चिरका, अस्पष्ट आवाज आला.

त्या दिशेनं पाहात तो म्हणाला, ``सध्या तरी हे मीच म्हणतो आहे, असं समजा. त्यानं काही फरक पडत नाही, पण साहेब, वैनीसाहेब या लोकशिक्षणात सक्रिय सहभागी होऊन परिवर्तनाच्या गतीला वेग देणं हे आपल्यासारख्या सुशिक्षित वर्गाचं कर्तव्यच आहे. हा वॉर्ड महिला राखीव झाला. अन्यथा...'' असे म्हणून तो थांबला. आपली चूक होतीय हे त्याच्याही लक्षात आले... ``हा वॉर्ड राखीव झाला म्हणून आपल्यासारख्याचं नेतृत्व आम्हाला लाभत आहे.''

आता हा तरुण भाषण करणार असे वाटू लागले होते. तोपर्यंत चहाही झाला होता. माझी भीड आता चेपली होती. मी म्हणालो, ``ते सगळं खरं आहे; पण आपली आचारसंहिता आपण पाळली पाहिजे. निवडणूक आयोगाची तर पाळायलाच हवी.''

आता आणखी एक तरुण पुढे येऊन म्हणाला, ``काका, तुम्ही त्याची काळजीच करू नका. आपली सगळी फिल्डिंग रेडी आहे. तुमच्या मार्गदर्शनानुसार पुन्हा प्लॅनिंग करू. शेवटी आपल्याला आपल्या विभागाचा विकास करायचाय.
Mayboli (Marathi Typing Software)
इथल्या माणसामाणसांचा, प्रत्येक बाईमाणसाचा विकास करायचा. हेच बघा काका, त्या पलीकडच्या वस्तीत बायकांना धड कपडा नाही. नळावरनं पाणी भरायचं तर हंडा नाही. त्यांचं हे दुःख आपलंच मानायला हवं का नको? त्याशिवाय त्यांना तरी आपल्याबद्दल विश्वास कसा वाटेल? दुसरा भाग सगळा सुशिक्षितांचा. तो तुम्ही बघा - बाकी गांधीबाबा आहेच.''

इथे गांधीबाबा कसे आले, हा प्रश्न माझ्या चेहऱयावर आला असावा. तसा तो म्हणाला, ``गांधीबाबाची गांधीगिरी काही ठिकाणी प्रभावी ठरेल.'' माझ्या चेहऱयावर समाधान पसरले. एका अर्थाने लोकशिक्षणाची संधी मिळणार होती. महिलांना त्यांच्या हक्काचा न्याय्य वाटा देण्यात माझा सक्रिय सहभाग राहणार होता अन् ही तर भाषणे काय करायची, याच्या तयारीला लागल्यासारखी वाटत होती.

झाले, आमच्या घरातली बैठक संपली आणि वैनीसाहेबांच्या उमेदवारीची बातमी सर्वत्र झाली.

आता घरात गर्दी असणार. आहे, नको पाहावे लागणार. मी तयारीला लागलो. संध्याकाळी अमिताभ बच्चनचा चित्रपट असूनही मी बाहेर पडलो. म्हटले तर तणाव होता. म्हटले तर आनंद. दुकानातून सामान घेतले अन् दोन झुरके मारायचे म्हणून थोडासा बाजूला थांबलो. माझ्यापासून थोड्याच अंतरावर दहा-बारा जणांचे टोळके गप्पा मारीत होते. विषय अर्थातच निवडणुका!

``तू इंदिरा वस्तीचं बघ. तिथं गांधीबाबाच चालेल, त्या साड्या संक्रांतीचं वाण म्हणून देता येतील अन् हे बघ बबन्या, त्या साल्या ƒƒƒचं तू बघ. सगळ्यांना पॅक करायला हवंय.''

``...अरे, पण त्या काकाचं काय?''

``...जाऊ दे रे, लोकशाहीत त्याचंही शिक्षण झालं तर काय बिघडतं?''

हाताला चटका बसला तेव्हा मला भान आलं. मी घराकडे वळलो. माझ्या लोकशाही शिक्षणाचा जांगळबुत्ता आता कोठे सुरू झाला होता.

 

---- `लोकमत' मधून साभार पुनःप्रकाशित

Please Use This Link To Refer This Article : http://articles.marathisrushti.com/?article=56


IMP Note: Contents on this website are uploaded by individual users who have been provided access to do so. While we respect the copyrights, Marathisrushti.com does not accept any responsibility of any copyright violation where the content/ image has been uploaded by any of our registered user. If any content/image contained on this site violates any copyrights, please notify us so that we can take further corrective action.



नविन प्रतिक्रिया

 HARSHAL  
GOOD

Date : 23-04-2010

 fayum  
I really umpressed of this site. Its a very good platform for marathi lovers to express their emotions,opions about any matter related to the development of our country. I am very thakful of its founder. bye.

Date : 19-04-2010

 Babu Desai  
Good.

Date : 02-03-2010




आपली प्रतिक्रिया कळवा
 
आपल्या मित्रांना कळवा
Typing Language:
Select Keyboard:




Mayboli (Marathi Typing Software)
 
© 2010 Langindia Infoservices Private Limited
 
 
Technology and Hosting Services Provided by Mastermind Technologies
(Best viewed @ 1024x768 Resolution and up,Recommended Browser IE 6.0 +)
 


A Marathi Mega Web Portal covering every aspect of marathi people, marathi community, marathi articles, marathi literature, Maharashtras culture, travel, arts, anything and everything about Marathi and Maharashtra. List yourself in Marathi Vyakti Sandarbh Kosh, the first and only Marathi People Encyclopedia. Marathi a regional language of India, is widely spoken in western India. Create you own blog, write articles post comments and much more.